फुलंब्री तालुक्यातील भीषण पाणी टंचाई !

Foto


औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यात दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसताना दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना जिवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच पानवाडीतील महिला पाणी काढताना विहरीत पडून जखमी झाल्या. तर रस्त्याच्या कामावर धुळ उडू नये. यासाठी टँकरद्वारे पाणी टाकणार्‍या टँकरच्या मागे भांडे घेऊन धावणार्‍या महिलांची कसरत चिड आणणारी आहे. हे सर्व पाहून या भागातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासिन धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्‍त केला जात आहे. यंदा जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने दुष्काळ पडला आहे. दुष्काळाच्या झळा सर्वांना बसल्या आहेत. ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत असलेले तलाव, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे. 

नुकतेच फुलंब्री तालुक्यातील  पानवाडी गावात शनिवारी विहिरीतून पाणी काढताना  सहा महिला, विहिरीत पडून जखमी झाल्या. तर औरंगाबाद-जळगाव रोडचे सध्या काँक्रिटीकरण करणे सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर टँकरद्वारे पाणी टाकले जाते. फुलंब्री गावानजीक गायरानात पाल टाकून राहणार्‍या भटक्या जमातीतील मंडळींनी वास्तव्य सुरू केले आहे. पण या २०-२५  कुटुंबाना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. नजीक ना कोणती विहीर ना पाण्याची सुविधा. त्यामुळे येथील महिला रस्त्यावर पाणी टाकण्यास कंत्राटदाराचे टँकर आले की या महिला पाण्यासाठी भांडे घेऊन टँकरच्या पाठीमागे धावतात. रस्त्याने वाहतूक सुरू असताना महिला पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. फुलंब्री तालुक्याचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे आहेत. पानवाडीतील दूर्घटनेनंतर बागडे हे जखमी महिलांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. आपल्याकडे एखादी दूर्घटना झाल्यानंतरच सरकार जागे होते. पण  दूर्घटना घडण्यापूर्वी नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. ही मोठी दुर्दैवी बाब होय. तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी ही पाण्याच्या समस्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.